तर पंचनामे झाले नाहीत त्यांची यादी बनवा; आमदार वैभव नाईक यांचे प्रशासनाला आदेश
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळातील ज्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल. तर ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांची यादी बनविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. देवबाग मध्ये ज्यांना खरेच नुकसान होऊन नुकसान भरपाई मिळाली अशांवर कोणी राजकारण करून अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचे पैसे मागे जाणार नाहीत, मात्र ज्यांची घरेच नाहीत व चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळाली त्यांची शहानिशा करून कारवाई केली जाईल असे आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे बोलताना सांगितले. आज मालवण दौऱ्यावर असणारे आमदार वैभव नाईक यांनी सरपंचाची आढावा बैठक तसेच तौक्ते वादळातील नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकरी व मच्छीमार यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, पं. स.सदस्य कमलाकर गावडे, निधी मुणगेकर यांसह अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या बैठकांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आम. वैभव नाईक यांनी सरपंचाच्या आढावा बैठकीत मांडण्यात आलेले ग्रामस्तरावरील अनेक प्रश्न सोडविण्यात आले असून काही ठिकाणी नवीन सजा निर्माण झाल्याने त्याठिकाणी तलाठी दफ़्तर आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोरोना विषयक नियमावलीत लोकांच्या एकत्र येण्यावर बंधने असली तरी आम्ही गावागावात ग्रामसभा घेण्यास आग्रही आहोत. याबाबत जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून ग्रामसभेच्या नोटिसा पाठविता येतील. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाल्यास गावाच्या समस्या व विकासाबाबत निर्णय घेता येतील, लोकांना प्रश्न मांडता येतील, ग्रामसभा आयोजनाबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, असेही आम. वैभव नाईक म्हणाले. वडाचापाट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येईल. या ग्रामपंचायतीसाठी आणखी एक इमारतीसाठी आपण आमदार फंडातून निधी देऊ.तौक्ते वादळातील काही नुकसानग्रस्तांना पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळालेली नाही, मात्र येत्या दोन दिवसात याबाबत कार्यवाही होऊन पंचनामे झालेल्याना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाही त्यांचीही यादी बनवून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत, पंचनामे न झालेल्यानाही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच ज्या मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत त्यांचे पुन्हा पंचनामे करण्याचे काम प्रशासनाच्या हातात आहे, आणि त्यांना मदत मिळवून देण्याचे काम आम्हा लोकप्रतिनिधींचे आहे, पंचनामे झालेल्याना मदत मिळवून देऊ असेही आमदार नाईक म्हणाले.
