*⚡वेंगुर्ला ता.०९-:* वेंगुर्ले तालुका कृषि विभागामार्फत येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “रानभाज्या महोत्सव 2021” संपन्न झाला. या महोत्सवात विविध प्रकारच्या 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तालुका कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक विजय घोंगे, आर. एम. केसरकर, आत्मा व्यवस्थापक डी. एच. गोळम, प्रगतशिल शेतकरी सुरेश धर्णे, बाळकृष्ण गाडगीळ सह अनेक शेतकरी उपस्थित होते. या रानभाज्या महोत्सवात अळंबी, कांजी, चीना, घोटूळी, गुळवेल, कोडशी, कामोणी, भारंगी, टायकाळा, घेवडा, शेवगा, बोडकांदी, पानफुटी, रानवाल, लाल उक्शी, मंडुकपर्णी, सोनारवेल, पेवा, अशा विविध 53 रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. येथील शेतकाऱ्यांना आपल्या सभोवताली आढळून येणाऱया रानभाज्यांची ओळख व्हावी, या रानभाज्यांचे जतन व संवर्धन व्हावे हा यामागील उद्देश होता. यावेळी आत्माचे व्यवस्थापक धनंजय गोळम यांनी रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व माणसाच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांची उपयुक्तता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विजय घोंगे यांनी मानले.
वेंगुर्ले तालुका कृषि विभागाच्या महोत्सवात विविध 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन
