गवंडीवाडा भागात गाय व वासरू बेवारस स्थितीत;मालकाचा होतोय कानाडोळा
*⚡मालवण ता.०७-:* मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून यात मोकाट गुरांची परवड होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एक गाय व तिचे नुकतेच जन्मलेले वासरू बेवारस स्थितीत फिरत असल्याची घटना घडली असतानाच अश्याच प्रकारे गवंडीवाडा भागात एक गाय व तिचे वासरू बेवारस स्थितीत फिरत आहे. या गायीने या वासराला नुकताच जन्म दिलेला असून गायीचा मालक समोर येत नसल्याने ही गाय वासरासह भटकत आहे. मालवण शहरात मोकाट गुरे व भटके कुत्रे यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर दिवसरात्र फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहन चालकांना समस्यांचा सामना करावा लागत असून रात्रीच्या वेळी गुरांना धडकून अपघातही होत आहेत. यामुळे वाहन चालकांसह गुरांच्या जीवितासही धोका होत आहे तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा शहरात मोठ्याप्रमाणावर संचार वाढला असून त्यांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मोकाट गुरे व कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सातत्याने नागरिकां मधून होत असतानाही नगरपालिकेकडून याबाबत वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असतानाच यामध्ये मोकाट गुरांची परवडही होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात नुकत्याच जन्म दिलेल्या आपल्या वासरासह एक गाय बेवारस स्थितीत फिरत होती याबाबत नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने गाय व वासराला नगरपालिकेच्या आवारात सुरक्षित स्थळी ठेवून त्यांच्या मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गवंडीवाडा भागातही एक गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासरासह बेवारसपणे भटकत असल्याचे समोर आले आहे. ही बाब जागरूक नागरिकांनी समोर आणली असून या गायीचा मालक कोण ? हे समजत नसल्याने त्याचा शोध नागरिकांकडून घेण्यात येत आहे. सुरक्षित जागेअभावी गाय व वासराची परवड होत असून याबाबत नगरपालिकेने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
