उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करूनही सा.बां.कडून दखल नाही

युवा रक्तदाता संघटना १५ ऑगस्टला अधिकाऱ्यांना घालणार घेराव

*⚡सावंतवाडी ता.०६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाला उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरून हलू दिले जाणार नाही. असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले की, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीचे दरवाजे खिडक्या यांची दुरवस्था झाली असून, एसी देखील बंद अवस्थेत आहे. रुग्णालय शेवटच्या घटका मोजत असून ब्लड स्टोरेज मशिनदेखील बंद अवस्थेत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कल्पना देऊन देखील कोणतीही हालचाल न केल्यामुळे अखेर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भाई देऊलकर, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page