१० ऑगस्टची सुनावणी रद्द करून शहर विकास आराखडा हरकतींवरील सुनावणी मालवणमध्येच घ्यावी

भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

*⚡मालवण ता.०५-:* जुलै महिन्यात आयोजित केलेली मालवण शहर विकास आराखड्यावरील हरकतींवरील सुनावणी रद्द झाल्यानंतर आता पुन्हा ही सुनावणी १० ऑगस्ट रोजी कोकण भवन नवी मुंबई येथे ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली आहे. कोरोना महामारी काळात या सुनावणीस मालवण वासीयांना नवी मुंबई येथे जाणे शक्य नसल्याने या सुनावणीस भाजपतर्फे हरकत नोंदवली असून १० ऑगस्टची सुनावणी रद्द करून ती मालवण मध्ये आयोजित करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण भाजप कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजय केनवडेकर हे बोलत होते. यावेळी नगरसेवक गणेश कुशे, नगरसेविका पूजा सरकारे, पूजा करलकर, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते. यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, मालवण शहर विकास आराखड्यावरील हरकतींच्या सुनावणी बाबत भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यावेळी आपल्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक गणेश कुशे, नगरसेविका पूजा सरकारे आदी उपस्थित होते. मालवण शहर विकास आराखड्यामधील बदलांबाबत नागरिकांनी हरकती नोंदविल्या होत्या. या संदर्भात दि. ८ जुलै रोजी ऑनलाईन सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र नेटवर्क मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार ही सुनावणी रद्द करण्यात आली होती. ही सुनावणी रद्द केल्याचे फुकाचे श्रेय नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी घेतले होते. मात्र याबाबत नगररचना विभागाकडून नोटीस काढून ही सुनावणी पुन्हा येत्या १० ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीने चक्क कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या कोरोना महामारी काळात नवी मुंबईत येथे प्रवास करून जाणे नागरिकांना शक्य होणार नाही हे आम्ही जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. सुनावणीच्या या आयोजनास भाजपतर्फे हरकत नोंदवली असून १० ऑगस्ट रोजी आयोजित केलेली सुनावणी रद्द करून मालवण येथे आयोजित करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही सुनावणी मालवण येथे न घेतल्यास नागरिकांच्या हक्कावर गदा येणार असून नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेपूर संधी मिळाली पाहिजे, असेही विजय केनवडेकर म्हणाले. मालवण शहर विकास आरखड्यामधील बदलांच्या हरकतींवरील सुनावणीच्या आयोजनाबाबत भाजप नेते निलेश राणे यांचेही लक्ष वेधले असून सुनावणी मालवणात होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निलेश राणे प्रयत्न करणार आहेत, असेही विजय केनवडेकर यांनी सांगितले. तसेच नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या सुनावणी बाबत मालवण नगरपालिका प्रशासनाने नगरसेवकांसह नागरिकांना चक्क व्हॉट्सऍप वर नोटिसा पाठविल्या आहेत, असे नगरसेवक गणेश कुशे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page