*खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मालवण : कोकणात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स कोरोना काळात आठ ते दहा महिने बंद आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो तरुणांच्या विचार करता वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळावी. अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असेही म्हटले आहे, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात हजारोच्या संख्येने वॉटर स्पोर्ट्सवर उपजिविका करणारे तरुण आहेत. मागील दहा महिने कोरोनामुळे वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत. परिणामी लाखो रुपयांची कर्जे काढून व्यवसाय सुरू करणाऱ्यांवर बँकांकडून जप्तीची कारवाई सुरू आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना वॉटर स्पोर्ट्स बंद असल्याने त्याचा परिणामही पर्यटनावर होत आहे. वॉटर स्पोर्टसला मंजुरी मिळावी म्हणून मेरीटाईम कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचारणा केली आहे. या सोबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स सुरू व्हावेत याबाबत निवेदनेही आम्ही आपल्याकडे सादर करत आहोत. तरी कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना खबरदारी नियमांचे पालन करून वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत आपण आदेश द्यावेत. या मागणीचे निवेदन खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.