*⚡कणकवली ता.०३-:* कणकवली तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा देखील तोडला जात आहे. याबाबत आक्रमक होत भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेतली. यावेळी चार दिवसांत वीज पुरवठ्यातील समस्या दूर करा तसेच चतुर्थीपर्यंत थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची मोहीम थांबवा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला. येथील महावितरण कार्यालयात भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशीर परूळेकर, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, प्रदीप गावडे, पप्पू पुजारे, सदा चव्हाण, करंजे सरपंच मंगेश तळगावकर, प्रदीप ढवण, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, गौरव यादव, पंकज सावंत, निखील आचरेकर आदींनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांची भेट घेतली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व गावांचा वीज पुरवठा चार दिवसांत सुरळीत करा अशी मागणी केली. खंडित वीज पुरवठ्याची समस्या कायम राहिली तर जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला. कणकवली तालुक्यात थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात आहे. मात्र गणेशोत्सव होईपर्यंत वीज पुरवठा तोडू नका. गणेशोत्सवात थकीत ग्राहक वीज बिले भरतील तोपर्यंत त्यांना सवलत द्यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. तर थकबाकीची रक्कम प्रचंड आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला वसूलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे थकीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरूच राहिल अशी भूमिका कार्यकारी अभियंता श्री.मोहिते यांनी मांडली. तसेच एकरक्कमी वीज बिल भरणा शक्य नसेल त्यांना हप्त्याची सवलत देत असल्याचेही ते म्हणाले. माजी नगरसेवक अण्णा कोदे यांनी चतुर्थीपूर्वी कुठल्याही ग्राहकाचा वीज पुरवठा तोडू नका. अन्यथा जनउद्रेकाला सामोरे जावे लागेल असे स्पष्ट केले. तालुक्यातील कलमठ, वरवडे, ओसरगांव आदी ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केव्हा होणार असा प्रश्न मिलिंद मेस्त्री यांनी केला. यावेळी वीज अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित असलेल्या गावांची नावे लिहून घेतली. प्रत्येकवेळी भाजप पदाधिकारी आले की गावांची नावे, वीज समस्या लिहून घेता. तर त्या समस्या सोडविल्या का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व सहाय्यक अभियंता श्री.नलावडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शासनाने यापूर्वी वीजबिल माफी देणार असल्याचे आश्वासन दिल्याने २०२० पासून काही ग्राहकांनीच बिले भरली नव्हती. मात्र आता शासनाने घूमजाव केले. असा आरोप सभापती मनोज रावराणे यांनी केला. कलमठ, वरवडे, पिसेकामते आदी भागात सातत्याने लाईट जात आहे. ओसरगाव, वागदे, बोर्डवे, कळसुली, हळवळ, लोरे गावात वारंवार जाणारी लाईट, लाईन वरील झाडी तोडणे, ट्रान्सफॉर्मर, गंजलेले पोल बदलणे, या विषयावर चर्चा करण्यात आली.
कणकवलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा
