दत्ता सामंत याना मंदार केणी यांचा सल्ला
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमाराना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगली मदत केली असताना काही मच्छीमाराना मदत न मिळाल्याबाबत भाजपचे नेते दत्ता सामंत हे मत्स्य अधिकाऱ्यांना धमकावून याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्याची भाषा करत आहेत. मात्र, फयान वादळावेळी मंजूर झालेली मदत नुकसान ग्रस्तांना मिळवून देण्यासाठी अटी शर्ती शिथिल करण्यात त्यावेळी नारायण राणे असमर्थ ठरले, आणि सुमारे पावणेतीन कोटीची मदत मागे गेली, तेव्हा दत्ता सामंत कुठे होते ? असा खोचक सवाल शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करत सामंत हे मत्स्य अधिकाऱ्यांवर दांडगेशाही करत असतील तर शिवसेना अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे, असा इशाराही दिला. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून मदत जाहीर होऊन ती अनेकांच्या बँक खात्यात जमा झाली. यामध्ये काही मच्छीमाराना मदत प्राप्त न झाल्याबाबत भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी मत्स्य अधिकाऱ्यांना जाब विचारत वंचित मच्छीमाराना मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले होते. याबाबत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरपालिका बांधकाम सभापती मंदार केणी, संमेश परब आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने तौक्ते वादळ ग्रस्तांना भरीव अशी मदत जाहीर करत अटी शर्थी शिथील करून बँक खात्यात जमा केली. यापूर्वीच्या वादळातील नुकसान ग्रस्तांना अशी मदत कधी मिळाली नव्हती. मच्छीमार बांधवांना देखील चांगली नुकसान भरपाई या मदतीतून मिळाली आहे. मच्छीमाराना मदत मिळवून देण्यासाठी मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य करत पंचनामे योग्य पद्धतीने केले होते. अजूनही जे मच्छिमार मदती पासून वंचित आहेत त्यांच्यासाठी पुरवणी यादी तयार करण्याचे आदेश आम. वैभव नाईक यांनी मत्स्य विभागाला दिले आहेत. मत्स्य अधिकारी चांगले सहकार्य करत असताना मदती पासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांबाबत दत्ता सामंत यांनी अधिकाऱ्यांना धमकवण्याचा प्रकार केला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधू असे सामंत म्हणाले. मात्र यापूर्वी आलेल्या फयान वादळावेळी नुकसानग्रस्तांना मंजूर झालेली अटी शर्तींमुळे नुकसान ग्रस्तांना मिळू शकली नाही. तेव्हा नारायण राणे अटी शर्थी शिथिल करण्यात असमर्थ ठरल्याने सुमारे २ कोटी ७० लाख रुपयांची मदत मागे गेली. तेव्हा दत्ता सामंत कुठे होते ? तेव्हा सामंत यांनी राणेंकडे कैफियत का मांडली नव्हती ? असे प्रश्न हरी खोबरेकर यांनी उपस्थित केले. वादळानंतर राज्य सरकार मदत करणार नाही, राज्यकर्ते भूल थापा मारत आहेत असे भाजपचे नेते त्यावेळी सांगत सुटले होते. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारने भरीव मदत जाहीर केल्याने भाजप नेते सैरभैर झाले असून या मदतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दत्ता सामंत केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. फयान वादळाच्या वेळी अटी शर्ती शिथिल करण्यात नारायण राणेंमध्ये धमक नव्हती. मात्र निसर्ग व तौक्ते वादळाच्या वेळी येथील लोकप्रतिनिधी व महाविकास आघाडी सरकारने अटी शर्ती शिथिल करण्याची धमकी दाखवून नुकसान ग्रस्तांना मदत मिळवून दिली. मत्स्य अधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून सामंत यांच्याकडून अधिकाऱ्यांना धमकविण्याचे प्रकार होत असतील तर शिवसेना मत्स्य अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे असेही हरी खोबरेकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मंदार केणी यांनीही दत्ता सामंत यांच्यावर टीका केली. तौक्ते वादळाच्या वेळी दत्ता सामंत कुठे दिसले नाहीत. सामंत हे केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत. नारायण राणेंनी आपल्याला दिल्लीत बोलवावे यासाठीच राणेंकडे लक्ष वेधू असे दत्ता सामंत बोलत असून त्यापेक्षा सामंत यांनी स्वतः राणेंकडे जाऊन प्रश्न मांडावा. अधिकाऱ्यांना धमकवण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून वंचितांना मदत मिळत असेल तर ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आव्हान आम्ही सामंत यांना देत असून ते त्यांनी स्वीकारावे असे मंदार केणी म्हणाले.
