जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य
मालवण दि प्रतिनिधी जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून रोटरी क्लबच्या वतीने माता व बालसंगोपन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह राबविला जात असून गर्भवती मातांसह स्तनदा मातांमध्ये पत्रके वाटून जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रम ‘सप्ताहा’पुरता मर्यादित न ठेवता वर्षभर राबविला जाणार आहे. या उपक्रमाची धुरा रोटरी क्लबच्या महाराष्ट्र विभागाच्या डिस्ट्रीक चेअरमन कॉर्डिनेटर डॉ. लीना लिमये यांच्याकडे आहे. डॉ. लिमये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आईचे दूध हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळाला सहा महिन्यांपर्यंत दुसरे कोणतेही अन्न व पाणी न देता केवळ आईचे दूध दिले गेले पाहिजे. सहा महिन्यांनंतरही स्तनपान सुरू ठेवून ताजा, मऊ व बाळाच्या वाढीला योग्य असा आहार बाळाला सर्व प्रकारे स्वच्छता बाळगून भरवावा. सर्व मातांमधे आपल्या बाळाला (अगदी जुळे असेल तरीही ) पुरेसे दूध निसर्गतः निर्माण होत असते. आईच्या दुधात बाळासाठी आवश्यक ती सर्व पोषणमूल्ये असतात. सुरुवातीच्या काळात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशावेळी दुधातील घटक हे बाळाचे संरक्षण करतात. स्तनपानामुळे बाळाला सहसा आजार उद्भवत नाहीत व त्यांचे आरोग्य उत्तम राहते असे डॉ लिमये यांनी म्हटले आहे
