*६ ऑगस्टला बैठक : जुन्या भाडेकरूंना प्राधान्याने गाळे मिळणार? : जुन्या इमारतीत ७० वर्षे होती भाडेतत्वावर दुकाने
*⚡वेंगुर्ला ता.०३-:* वेंगुर्ले नगर परिषदेच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठ इमारतीच्या तळमजल्यावरील गाळा क्र. १ ते १५ च्या लिलाव प्रक्रियेस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. या संदर्भात शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. न. प. सभागृहात आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा नगरविकास अधिकारी सोनल अदरकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पूर्वीच्या भाडेकरूंना प्राधान्याने गाळे देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. *न. प. ने राबविली होती ई लिलाव प्रक्रिया* वेंगुर्ले न. प. ने सागररत्न मत्स्यबाजारपेठ इमारतीच्या तळमजल्यावरील गाळा क्रमांक १ ते १५ करिता २३ ते २९ जुलै कालावधी ई लिलाव प्रक्रिया राबविली होती. गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. २९ जुलै सायंकाळी ५.३० वाची अंतिम वेळ होती. परंतु सध्याच्या अतिवृष्टी तसेच कोरोना कालावधीमध्ये दिलेली मुदत अत्यल्प असल्याने वेळ वाढवून मिळावी व लिलाव प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी येथील व्यापाऱ्यातर्फे डॉ अमितकुमार सोंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार दोन दिवस वाढवून देण्यात आले होते. सोमवारी २ ऑगस्टला लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या लिलाव धारकांच्या अर्जांची छाननी होणार होती. ३ ऑगस्टला लिलाव प्रक्रीया होणार होती. मात्र, सोमवारी सकाळी नगरविकास खात्याकडून लिलाव प्रक्रिया दोन आठवड्यासाठी स्वमित करावी, असे आदेश आल्याने होणारी छाननी रद्द करण्यात आली. *पूर्वीच्या भाडेकरूंना प्राधान्य द्या, व्यापायांची मागणी* वेंगुर्ला न. प. च्या जुन्या इमारतीमध्ये व्यापारी बांधवांची ६० ते ७० वर्षे भाडेतत्वावर दुकाने होती. सदर इमारत पाडून त्यावर मच्छीमार्केट बांधकाम पूर्ण केले. सदर इमारत व गाळे पाडण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशाने न. प. ने गाळेधारकांना पर्यायी जागेत तात्पुरते गाळे दिले होते. तत्कालीन पालकमंत्र्यांनी मच्छीमार्केट पूर्ण झाल्यावर नवीन इमारतीमध्ये पुन्हा दुकान गाळे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मच्छीमार्केटच्या नूतन इमारतीमधील दुकान गाळ्यामध्ये भाडोत्री म्हणून अग्रहक्काने दुकानगाळे देण्यात यावेत, अशी मागणी पूर्वीच्या भाडेकरुनी वेंगुर्ला तालुका व्यापारी व व्यावसायिक संघातर्फे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. आमदार दीपक केसरकर यांनी यासंदर्भात वारंवार नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्यांना यश आले असून न.प. ने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेस नगरविकास मंत्र्यांनी दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. *६ ऑगस्टला बैठक* नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वा. आमदार दीपक केसरकर नगराध्यक्ष दिलिप गिरप, जिल्हा नगरविकास अधिकारी सोनल अदरकर, मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पूर्वीच्या भाडेकरुना अग्रक्रमाने दुकानगाळे देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. भाडेकरूही आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यास तयार असल्याने या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
