४५ लाख ८२ हजारांचे नुकसान ;१२३ घरांची अंशत: हानी
*⚡कणकवली ता.०३-:* अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने कणकवली तालुक्यातील १२३ घरांची अंशत: हानी झाली असून १४ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर ८७ दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने १० लाख ७२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३८ घरे, १२ गोठे,७ झोपड्या यांच्यासह ८१ हेक्टर भातशेतीची हानी झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे एकूण नुकसान ४५ लाख ८२ हजार रुपये इतके झाले आहे. अजूनही कृषी विभागाच्यावतीने पंचयादी घालण्याचे काम सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कणकवली तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना मोठे पूर आले होते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. तसेच पाणी साचून राहिल्याने काही गावांमध्ये शेती कुजून गेली. तर पुराचे पाणी शेतात घुसल्याने त्यासोबत आलेला गाळ भातशेतीत गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकर्यांनी भात लावणीची कामे आटोपली असताना त्यातच पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांचे कष्ट वाया गेले. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून सुरू असून आतापर्यंत ८१ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात गेल्याने तालुक्यातील सुमारे १६१ घरांचे नुकसान झाले आहे. खारेपाटण बाजारपेठेसह तालुक्यातील इतर बाजारपेठा व विविध गावातील ८७ दुकानांमध्ये पुराचे पाणी गेल्याने व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आले. खारेपाटण बाजारपेठेतील काही दुकानांचे पंचनामे करणे अद्यापही सुरू आहे.तालुक्यातील १२ गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर कलमठमधील २ शेतकर्यांच्या ३ मुरा जातीच्या म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे ३ लाख ७० हजार रूपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर कणकवली जानवली नदीवरील गणपती साना येथील ७ झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. दिगवळे-रांजणवाडी येथे डोंगर घरावर कोसळल्यानंतर स्थानिक नागरीकांबरोबरच प्रशासकीय यंत्रणेनेसुध्दा मदत कार्यात मोठा सहभाग घेतला. खारेपाटण, लोरे, वागदे, वरवडे, कलमठ आदी गावांमध्ये पुराचे पाणी घरापर्यंत आल्याने तातडीने अशा नागरीकापर्यंत यंत्रणा पोहोचत होती. पुरस्थिती आटोक्यात आल्यानंतर महसूल, कृषी यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पूरस्थिती मुळे नागरिकांना कमी-अधिक प्रमाणात झळ पोहोचली आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून मिळणार्या मोफत धान्याचे वितरण पुरवठा यंत्रणेमार्फत रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून केले जात आहे.
