नागरिकांत भीतीचे वातावरण : वनविभागाने गस्त घालण्याची मागणी
*💫बांदा दि.१२-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस इटलादेवी येथे आज दुपारी 3.50 वाजता दोन गव्यांनी दर्शन दिले. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी माय लेकाचा गव्याने पाठलाग केला होता. सध्या काजूचा हंगाम सुरू होणार असल्याने काजू बागायतदारांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे काजूचा मोहर गेल्याने उत्पन्न कमी होणार या चिंतेने शेतकरी ग्रासला असताना काजू बागायती जवळ दोन महाकाय गव्यांनी दर्शन दिले. सहा महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका भल्या मोठ्या गव्याने माय लेकाचा पाठलाग केला होता. त्यामुळे बागायतीमध्ये जाण्यास शेतकरी घाबरत आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शनिवारी दुपारी मडुऱ्याहून दांडेलीच्या दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना व गावातील काजू बागायतदारांनाही दोन भल्या मोठ्या गव्यांचे दर्शन झाले. जीव वाचवण्यासाठी सर्वजणांनी तेथून पळ काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार ते गवे काजू बागायतीत गेले. त्यामुळे काजू बागायतदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.