निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याजवळ केले सादर
*⚡ओरोस दि.२९-:* रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हा प्रशासनाला गुरुवारी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात कोरोना काळातील सात मागण्यांचा व कायमस्वरूपी सात मागण्यांचा अशा एकूण १४ मागण्यांचा समावेश आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक हार्दीक शिगले, सागर सारंग, सह संघटक कल्पना बांदेकर, महेश जांभोरे, रामचंद्र आईर आदी उपस्थित होते. रंगकर्मी हा ८० टक्के रोजंदारीवर काम करीत असतो. कोरोना महामारीत गेल्या दीड वर्षात मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला असताना सरकारने रंगकर्मीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ते अस्वस्थ आहेत. तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड आदी लोककलांसह वाद्यवृंद, सिनेमा, मालिका, नाट्य क्षेत्रातील कलाकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात ‘सोसायटी आवारात मोजक्या जागेत होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी द्यावी. फी न भरल्याने रंगकर्मीच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. हा प्रश्न तात्काळ निकाली काढावा. दीड वर्षात घरभाडे व वीजबिल थकले आहे. आर्थिक गंभीरतेमुळे ही अडचण निर्माण झाल्याने यात सवलत मिळावी. नियमांचे पालन करून कला सादर करण्यास परवानगी द्यावी. कलाकारांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी. रंगकर्मी रोजगार हमी योजना सुरू करावी. सर्व रंगकर्मीना पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्यावा, अशा सात कोरोना संबंधी मागण्या करण्यात आल्या. तर राज्यातील सर्व रंगकर्मीच्या शासन दरबारी नोंद करावी. कलाकार मानधन योजनेच्या अटींमध्ये शिथिलता आणून लाभ द्यावा. मुंबईतील शासनाच्या निवास व्यवस्थेत रंगकर्मीसाठी प्राधान्याने सवलतीच्या दरात निवास व्यवस्था करावी. जिल्ह्यांत रंगकर्मीसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह उभारावी. म्हाडा आणि सिडकोच्या घरांच्या राखीव कोठ्यात पाच टक्के रंगकर्मीसाठी वाढ करावी. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मीसाठी शासकीय वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. शासकीय हॉस्पिटलमध्ये राखीव बेड ठेवावे. या कायमस्वरूपी मागण्या करण्यात आल्या आहेत.
