पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

संघाच्या वर्धापनदिनी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रदान

💫सावंतवाडी ता.२८-:* कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्लोबल महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना अनुसूचित जमाती आढावा कमिटीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रदान करण्यात आला. कोकण विभाग पत्रकार संघाचा ९ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा देशमुख मराठा हॉल संगम मुरबाड ठाणे येथे साजरा झाला. यावेळी एन के टी संस्थेचे अध्यक्ष नानजी भाई ठक्कर ठाणावाला, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा ठाणे महानगर पालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील, प्रबोधनकार कैलास महाराज निचिते, पंचायत समिती सदस्य सुभाष हरड, देशमुख – मराठा समाज अध्यक्ष काशिनाथ आबा झुंजाराव, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, जेष्ठ पत्रकार महेश धानके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भांगरथ, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कोकण विभाग पत्रकार संघाच्यावतीने ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचे पत्रकार प्रसन्न गोंधावळे, दैनिक प्रहारचे सचिन रेडकर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना दौलत दरोडा म्हणाले, कोविड काळात जीवाची बाजी लावून पत्रकार काम करीत होते, त्यामुळे पत्रकार हे सुध्दा खरे कोविड योद्धे असल्याचे यांनी यावेळी सांगितले. तर विधायक कामांसाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकार व पत्रकार संघ यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असून पत्रकारांच्या समस्या शासकीय स्तरावर मांडणार असल्याचे आश्वासनही यावेळी आमदार दरोडा यांनी यावेळी दिले. कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हांडोरे पाटील म्हणाले, कोकणातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कोकण विभाग पत्रकार संघ कटिबध्द असून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असतानाच कोकण विभाग पत्रकार संघाच्या कोकणातील सर्व जिल्हा व तालुका कमिट्या सामाजिक कार्यात यापुढेही कार्यरत राहतील, असे आश्वासनही यावेळी हांडोरे पाटील यांनी दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष जगन्नाथ गायकर, ठाणे जिल्हा अध्यक्ष शामकांत पतंगराव यांच्या नेतृत्वाखाली शहापूर व मुरबाड तालुका शाखेने विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमात संपादक उमेश भेरे यांच्या दैनिक अग्रलेखच्या कोकण विभाग पत्रकार संघ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभाग पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन करूणा गगे व शिवाजी सातपुते यांनी केले.

You cannot copy content of this page