*💫कणकवली दि.२९-:* माणूस निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्ग आहे तर माणूस आहे पण सध्या मानवाद्वारे निसर्गामध्ये हस्तक्षेप चालू आहे, त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे आणि याचाच एक भाग म्हणजे ‘प्लास्टिक’ असल्याचे मत प्रा.अनघा पंडित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय ,भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नुकतीच देवगड, पुरळ येथे प्लस्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली आणि कापडी पिशव्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्लास्टिक पर्यावरण आणि निसर्ग यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन श्री.रमेश खरात यांनी केले तसेच सेंद्रिय खत कीटकनाशके आणि गांडूळ खत या संदर्भात उपयुक्त माहिती श्री. सुरेंद्र तेली उपस्थितांना दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.अनघा पंडित,जन शिक्षण संस्थान,सिंधुदुर्गचे कार्यक्रम अधिकारी गणेश परब,रमेश खरात तसेच प्रशिक्षक श्री. सुरेंद्र तेली,सौ.रोहिणी चव्हाण,धनंजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मानवाद्वारे निसर्गामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपामुळेच पर्यावरण प्रदूषण :प्रा.अनघा पंडित
