सेवादल काँग्रेसची मागणी
*💫मालवण दि.२८-:* मालवण रा. प. आगरातून यापूर्वी सुरू असलेल्या व कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील एसटी बस फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसच्या वतीने मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याबाबतचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँगेसचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांना सादर केले. यावेळी महेश अंधारी, पल्लवी तारी, देवानंद लुडबे, सरदार ताजर, गणेश पाडगावकर, दिलीप तळगावकर आदी उपस्थित होते. मालवण- मुंबई, मालवण – बोरिवली (स्लीपर) यासह मालवण आगारातुन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्ववत चालू कराव्यात. तसेच मालवण आगारासाठी स्लीपर गाड्या उपलब्ध होणे गरजेचे असून ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होणे गरजेचे आहे. तसेच मालवण- तारकर्ली- देवबाग ही स्थानिक बस फेरी देखील तात्काळ सुरू करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. तसेच एसटी विभागाने चांगल्या सुविधा देत खासगी वाहतूक सेवेशी स्पर्धा करणे आवश्यक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी एसटी फेऱ्या लवकरच सुरू करण्यात येतील, असे सांगितले.
