शंभर डोसही पडले कमी ः ग्रामस्थ परतले लसीविना; पूर्णक्षमतेने लसीकरण करण्याची मागणी
*💫बांदा दि.२८-:* बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पाडलोस गावासाठी कोरोना प्रतिबंध कोव्हेक्सीन लसीचे 100 डोस उपलब्ध झाले होते. परंतु गावीतल प्रत्येक वाडीवर विभागून लस देण्यात आल्याने संख्या मोठी व डोस कमी पडले. परिणामी अनेक नागरिकांना लसीविना माघारी परतावे लागले. त्यामुळे दुसऱ्यावेळी पूर्णक्षमतेने गावाचे लसीकरण करण्याची मागणी पाडलोस मधील वंचित ग्रामस्थांनी केली. पाडलोस ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच अक्षरा पाडलोसकर, आरोग्य सेविका एस. रंगसूर, समुदाय आरोग्य अधिकारी टी.आर.माजगावकर, आशासेविका कविता आंबेकर, मदतनीस सुनंदा केरकर, आरोग्यसेवक श्री.वेटे, ग्रा.पं.सदस्य लीना माधव, पोलिस पाटील रश्मी माधव, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, पाडलोस युवासेना शाखाप्रमुख रोहित गावडे, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, शुभांगी नाईक आदी उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील नऊ वाड्यांना विभागून टोकनप्रमाणे लसीकरण करण्यात आले. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले शंभर डोस कमी पडल्याने अनेक नागरिकांना लस मिळाली नाही. गावात कोरोना बाधित सक्रिय रुग्ण संख्या शुन्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावाचे लसीकरण करण्यासाठी राजू शेटकर यांनी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधले होते. परंतु उपलब्ध शंभर डोसही कमी पडल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सद्यस्थित अनेक नागरिकांना लसीविना माघारी परतावे लागल्याने आपण पुन्हा आरोग्य विभाग व तहसिलदार यांच्याकडे गावाचे पूर्णक्षमतेने लसीकरण करण्याची मागणी करणार असल्याचे, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सांगितले.
