तुतारी एक्स्प्रेसखाली झोकून देत जीवन संपविले

कणकवली 26 जुलै सावंतवाडीहुन दादरला जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसखाली अज्ञाताने आत्महत्या केल्याची घटना कणकवली रेल्वे स्थानकात आज सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी घडली. तुतारी एक्सप्रेस सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कणकवली रेल्वे स्थानकात आली. इंजिनपासून तिसऱ्या डब्यातील पुरुष दरवाजातून खाली उतरला. रेल्वेतून उतरल्यानंतर तो इसम तुतारी एक्सप्रेसखालीच रेल्वे ट्रॅकवर झोपून राहिला. दरम्यान मालगाडी पास झाल्यानंतर तुतारी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असता त्या अज्ञात इसमाच्या डोक्यावरुन रेल्वे गेली. त्या इसमाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. आत्महत्या केलेल्या पुरुषाच्या अंगावर लुंगी आणि बनियान असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. या घटनेची खबर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ कणकवली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, पीएसआय अनमोल रावराणे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांच्यासह घटनास्थळी जात मृतदेहाची पाहणी केली. मृतदेह रेल्वे ट्रॅकवरून बाजूला ठेवला. त्यानंतर तुतारी एक्सप्रेस दादरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

You cannot copy content of this page