तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला;तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद:अरविंद मोडकर व अमृत राऊळ यांचा आरोप
*💫मालवण दि.२५-:* मालवण तालुक्यातील तौक्ते वादळग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच चुकीचा अहवाल दिल्याने प्रत्यक्षात मोठी हानी झालेले वादळग्रस्त या लाभापासून वंचित आहेत. तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला दिला जात आहे. यामध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मालवण तालुका युवक काँग्रेस प्रवक्ते अरविंद मोडकर आणि अध्यक्ष अमृत राऊळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मालवण तालुका युवा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन मालवण तालुक्यातील तौक्ते वादळग्रस्त नागरिक नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहिल्याकडे लक्ष वेधले. काही नागरिकांना प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जास्त मोबदला दिला जात आहे. ज्यांचे नुकसान झाले, घरे जमीनदोस्त झाली, अशा कुटुंबांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यांना तात्काळ भरपाई मिळावी, यासाठी स्वतः लक्ष घालून संबंधित मालवण तहसीलदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी मालवण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अमृत राऊळ, प्रवक्ते मोंडकर यांनी केली आहे. यावेळी संजय मोंडकर, मनोहर भाटकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मालवण तहसीलदारांना नुकसानीबाबत संबंधित तलाठ्यांकडून माहिती घेण्याच्या सूचना केल्याचे मोंडकर यांनी सांगितले.
