साळिस्ते स्मशानभुमीकडे जाण्यासाठी बांधलेली मोरी वाहून गेल्याने गैरसोय

निष्कृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

*💫कणकवली दि.२५-:* कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावातील स्मशानभुमिकडे जाण्यासाठी बांधलेली मोरी एका वर्षातच पहिल्याच पावसात दोन वर्षांपूर्वी वाहून गेली. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला लेखी कळवून त्याला एक वर्ष होऊन गेले तरीही त्याकडे लक्ष न घातल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्रामसेवक विशाल वरवडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, 14 व्या वित्त आयोगातून ते काम करण्यात आले होते. केवळ ओहोळाचा अंदाज न आल्याने मोरी वाहून गेली नसून त्याठिकाणी भराव टाकण्यात आला होता, तो भराव वाहून गेला. याबाबत आम्ही अनेकदा वरिष्ठ कार्यालयात मागणी केली आहे. तसेच, तत्कालीन कणकवली सभापती दिलीप तळेकर आणि जिल्हा परिषद बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनाही हे काम दाखवून अत्यावश्यक म्हणुन या मोरिचे काम करुन मिळण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांची मागणी अगदी योग्यच आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, साळिस्ते गावातील स्मशानभूमी‌वरील मोरिचे नविन बांधकाम केल्यानंतर सहा महीन्यातच दोन वर्षांपूर्वी ही मोरी पावसाळ्यात वाहून गेली. त्यामुळे गावातील एखादा मृतदेह स्मशानात ‌नेताना खुप जोखिम घेवुन न्यावे लागते. पावसाळ्यात तर खुपच हाल होतात. एवढी गावातील स्मशानभूमीची भीषण अवस्था झालेली आहे. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता ग्रामसेवक विशाल वरवडेकर व सरपंच सौ. मैथिली कांबळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीच शिवाय आम्हांला विचारले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू असेही वक्तव्य केले. याबाबत ग्रामस्थांनी जुन 2020 मध्ये दिलेल्या लेखी निवेदनामध्ये म्हटले आहे की, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गरजेची बाब म्हणुन ग्रामपंचायतीकडून रस्ता आणि स्मशानभूमी जोडणारी ओहोळावर मोरी बांधली. मात्र, ते काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की, ती मोरी पहिल्याच पावसात संपूर्ण वाहून गेली. त्यानंतर त्याला एक वर्ष होऊनही ग्रामपंचायतीने त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही.  हा विषय गंभीर असुन आता दोन वर्षे झालीत तरी त्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. इतके निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला याबाबत विचारणा का केली गेली नाही? असे प्रश्न उपस्थीत केले. यामुळे हे निष्कृष्ट दर्जाचे काम झाले असून त्या कामाची सखोल चौकशी करून सदरचे काम सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी  ग्रामपंचायतीचा कोणताही अतिरिक्त निधी खर्च ‌न करता त्यांच्या स्वखर्चाने आपल्या देखरेखीखाली करून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने रवींद्र गुरव, वैभव कांबळे, तेजस गुरव, माजी उपसरपंच उदय बारस्कर, गिरिष कांबळे, स्वप्निल कुलकर्णी, मारुती गुरव, विलास रांबाडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे. 

You cannot copy content of this page