एक म्हैस ठार झाली तर दोन म्हैशी पुराच्या पाण्यात वाहिल्या
*💫बांदा दि.२५-:* बांदा मुस्लिमवाडी येथे तेरेखोल नदी किनाऱ्यालगत असलेला दाऊद आगा यांचा गोठा मुसळधार पावसात कोसळल्याने 1 म्हैस ठार झाली तर २ म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आगा यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बांद्यात महापुराने हाहाकार उडाला असून कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. दुकाने, घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. दाऊद आगा यांचा गोठा मुस्लिमवाडी येथे तेरेखोल नदी किनाऱ्यालगत आहे. पुराच्या पाण्याच्या तडाख्याने गोठा कोसळला. याठिकाणी पाण्याचा वेग अधिक असल्याने गुरांना वाचविणे शक्य झाले नाही. गोठा कोसळल्याने एक म्हैस जागीच गतप्राण झाली. तर दोन म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याचबरोबर गोठ्याचे लाकडी छप्पर, शेतीपंप देखील वाहून गेलेत. यामध्ये आगा यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
