तळाशील समुद्रकिनारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न

मालवणचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी दिली माहिती

*💫मालवण दि.२४-:* मालवण तळाशील समुद्र किनारी काल कुजलेल्या स्थितीत सापडून आलेल्या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नसून ओळख पटविण्याच्या दृष्टीने तसेच त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी मालवण पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत असे मालवणचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी सांगितले. मालवण तळाशील समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी कुजलेल्या स्थितीतील एक मृतदेह दिसून आल्यानंतर स्थानिक मच्छीमार संजय तारी यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. या मृतदेहाचे लचके भटके कुत्र्यांनी तोडल्याने हा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात आणणे शक्य नसल्याने तळाशील येथेच डॉक्टरांच्या साहाय्याने या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नव्हती. सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. अंगावर गुलाबी रंगाचे शर्ट होते. सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती असून पुराच्या पाण्याबरोबर हा मृतदेह वाहुन आला असावा या शक्यतेने या मृतदेहाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच रत्नागिरीतील पोलीस स्थानकांमध्ये कळविण्यात आले आहे, अशी कोणती व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा पुरात वाहून गेली असल्यास मालवण पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page