*💫बांदा दि.२४-:* मुसळधार पावसामुळे निगुडे गावात पुराचे पाणी शिरले. पाण्याचा ओघ वाढल्याने निगुडे पाटीलवाडीतील अनेक घरांना फटका बसला. पहाटे सकाळी चार वाजता हळू पुराचे पाणी घरामध्ये शिरायला सुरुवात झाले. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. हा हा म्हणता संपूर्ण घरांमध्ये पाणी घुसले व लाखो रुपयांचे नुकसान झाले. पंचनामा करण्याचे काम सुरू असून अद्याप नेमका नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. महापुरात निगुडे पाटीलवाडीतील माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, जूजे फर्नांडिस, अरुण शेगडे, बेजनी गुडीनो, दशरथ पाटील, श्याम पाटील, नंदकिशोर पाटील, दयानंद पाटील, आगोस्तीन गुड्डीनो, लक्ष्मी पाटील यांचे नुकसान झाले. तसेच संजय पाटील यांच्या घराची मातीची भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्शल गुड्डीनो, बाबू गुड्डीनो यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. अनेक गाड्याही पाण्यामध्ये अडकून पडल्या. चारचाकी गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. तसेच पिण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले. इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, तांदूळ कडधान्य तसेच सोपा, बेड घरातील सर्व वस्तूंची पुरामुळे विल्हेवाट लागली. काही जणांच्या घरात धान्यही शिल्लकच काही नाही राहिले. पुराचे पाणी, गाळ सर्व घरांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले. निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी पूरस्थितीची पाहणी केली. निगुडे तलाठी भाग्यलक्ष्मी शिंदे यांनी पूरस्थितीची पाहणी केली परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे वस्तीमध्ये जाता आले नाही. शासनाने अलर्ट केल्यामुळे दिनांक 25 जुलै पर्यंत नागरिकांनी घरीच थांबावे विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहनही सरपंच समीर गावडे यांनी केले आहे.
निगुडेत पुरामुळे लाखोंचे नुकसान
