नाटळ येथील मल्हार नदीवरील पुलाचे बांधकाम हे सैन्य अभियांत्रिकीकडे द्यावे

आम्ही कणकवलीकरच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी

*💫कणकवली दि.१३-:* नाटळ येथील मल्हार नदीवरील पुलाचे बांधकाम हे सैन्य अभियांत्रिकीकडे देऊन लवकरात लवकर बांधून ध्यावे ,जसे सावित्री नदीवरील पुल सैन्य अभियांत्रिकीने कमीत कमी वेळात चांगले बांधून दिलेले होते तसेच या पुलाचे बांधकाम करावी अशी मागणी आम्ही कणकवलीकरच्यावतीने डॉ.सुहास पावसकर व अशोक करंबेळकर यांनी उपविभागीय दंडाधिकारी , कणकवली यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्गामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्हाभर हाहाकार माजलेला आहे . वेगाने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे . त्यातच नाटळ गावातील मल्हारी नदीवरील जुने पुल पाण्याच्या जोरावर वाहून गेलेले आहे . तसं पाहिलं गेलं तर त्या पुलाचं यापूर्वी संरचनात्मक लेखापरीक्षण होण गरजेचे होते . हे पुल कोसळल्यामुळे ५-६ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे . त्याचबरोबर ८ ते ९ हजार जनतेचे हाल होणार आहेत . कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे वाटत असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही आहे . यदाकदाचित या गावातील जनतेला कोरोना आजाराचा संसर्ग झाला तर आरोग्य यंत्रणेला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे . डिलीव्हरी , हृदयरोग , सर्पदंश इ.तात्काळ आजार उद्भवल्यास प्राणहानी होण्याची शक्यता जास्त आहे . संपर्क तुटलेल्या गावांचा नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने तेथील जनतेला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे . ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांचे हाल होण्याची शक्यता जास्त आहे . त्याचबरोबर शालेय मुलांचे सुध्दा शैक्षणिक नुकसान होणार आहे . वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर पुलाचे बांधकाम लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे . महाराष्ट्र शासन निश्चितच त्यादृष्टीने पाऊले उचलतोय याची खात्री आहे . परंतु शासनाच्या लाल फितीमध्ये अडकून राहू नये असे आम्हाला वाटते . त्यामुळे सदर पुलाचे बांधकाम हे सैन्य अभियांत्रिकीकडे देऊन लवकरात लवकर बांधून ध्यावे असे आम्हाला वाटते . जसे सावित्री नदीवरील पुल सैन्य अभियांत्रिकीने कमीत कमी वेळात चांगले बांधून दिलेले होते . तरी कृपया या मागणीचा शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी डॉ.सुहास पावसकर श्री.अशोक करंबेळकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page