रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी : शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांची मागणी
*💫वैभववाडी दि.२३- :* तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झालेल्या तिथवली – दिगशी या रस्त्याला भेगा पडल्या आहेत व रस्ता खचला आहे. या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. या घटनेची दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रधानमंत्री सडक योजना विभाग यांना निवेदन देऊन रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी असी मागणी केली आहे. तिथवली-दिगशी हा मार्ग गुरुवारी खचला. सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत रस्त्याला लांबच लांब भेगा गेल्या आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खचला देखील आहे. यासंबंधीची माहिती युवासेनेचे सचिव स्वप्नील धुरी यांनी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोकेंना दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोके यांनी कार्यकारी अभियंता पंतप्रधान सडक योजना यांना पत्र लिहून या घटनेबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये २ कोटी ४९ लाख रुपये खर्चून हा रस्ता बनविण्यात आला होता. यावेळी या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत ठेकदाराविरोधात तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र आपल्या विभागाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळेच पाच वर्षात हा रस्ता खचला आहे.आता या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी लोके यांनी केली आहे.
