मुसळधार पावसामुळे कालावल खाडी पट्ट्यात पूर परिस्थिती

समुद्री उधानाने किनारपट्टी भागात हाहाकार

*💫मालवण दि.२३-:* गेले दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल रात्रीपासून कालावल खाडी पट्ट्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून कालावल खाडी बरोबरच गड नदीने उग्र स्वरूप धारण केल्याने खाडी पट्ट्यात तर समुद्री उधानाने तोंडवळी, तळाशील, आचऱ्याच्या किनारपट्टी भागात पाण्याने शिरकाव करीत हाहाकार उडवून दिला आहे . दरम्यान, गड नदी आणि कालावल खाडी पट्ट्यातील चार गावांमधील सात कुटुंबातील २६ व्यक्तींना पूर परिस्थितीमुळे स्थलांतरित करण्यात आले आहेत. समुद्री उधाणाच्या लाटांनी तळाशील किनारपट्टीला तडाखा देत ३०० मीटरची किनारपट्टी गिळंकृत केली आहे. कालावल खाडीतील खोत जुवा, मसुरकर जुवा, हडी पाणखोल जुवा या बेटांना पुराने वेढले आहे तर गड नदीने आपली पाण्याची पातळी ओलांडल्याने किनाऱ्यावरील बेळणे, श्रावण, गोठणे या भागात नदीच्या पाण्याने शिरकाव करून ग्रामस्थात घबराट माजवली. मसुरे, बांदिवडे या भागातही गड नदीच्या पुराचा संचार वाढला असून गावा- घरात पाणी घुसले आहे. गडनदीला आलेल्या पुराने मसुरे कावावाडी, टोकळवाडी सह बांदिवडे, चिंदर, तेरई तसेच खोत जुवा, मसुरकर जुवा, सय्यद जुवा, हडी पाणखोल जुवा या भागात ग्रामस्थांच्या अंगणात पुराच्या पाण्याने प्रवेश केला होता. गुरुवारी रात्री कमी झालेली पाण्याची पातळी पुन्हा शुक्रवारी सकाळी वाढू लागली. मसुरे तील रमाई नदीची पाण्याची पातळी कमी असल्याने मसदे मार्ग चालू होता तर कांदळगाव व मागवणे मार्ग पाण्याखाली गेला होता. तीन दिवसांच्या फरकाने पुन्हा एकदा पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. गडनदीचे पाणी विरुद्ध दिशेने रमाई नदी सह त्रिंबक नदी मधून वस्तीत घुसले आहे. मुसळधार पावसामुळे गडनदीला आलेल्या पुराचा तडाखा तोंडवळी तळाशील या गावालाही बसला आहे तुडुंब भरलेले नदीचे पात्र व त्यातच समुद्राला आलेले उधाण यामुळे काल रात्रीपासून तोंडवळीतील नदी काठच्या वाडींमध्ये नदीचे पाणी भरून अनेक घरांना पाण्याने वेढले आहे. तेथील बौद्धवाडीला संपूर्ण पाण्याने वेढले आहे तर करंजेवाडी, बावकरवाडी, देवाचे टेंब वाडी या वाडींमध्येही पुराचे पाणी घुसले तोंडवळी मध्ये भरलेल्या या पाण्याच्या स्थितीची सरपंच आबा कांदळकर, उपसरपंच दशरथ वायंगणकर यांनी तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली. तर दुसरीकडे समुद्राच्या उधाणाचा फटका तळाशिलला बसला असून समुद्री लाटांमुळे बंधारा नसलेला भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये केवळ वीस फुटांचेच अंतर राहिले आहे. तसेच रेवंडकरांचे घर ते लक्ष्मण तांडेल यांच्या घरादरम्यानच्या ३०० मीटर भागात मोठ्या प्रमाणात धूप झाली असून समुद्राचे पाणी वस्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वेगाने येणाऱ्या उधाणाच्या लाटांमुळे भूभाग खचत असून सुरुची झाडे, माडाची झाडे कोसळत आहेत. मुख्य विद्यूत वाहिनींचे पोलही धोकादायक बनले असून काही पोल कोसळले आहेत. गड नदी आणि कालावली खाडी पट्ट्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे समजताच मालवणचे तहसीलदार अजय पाटणे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी आज या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त व्यक्तींना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, कालावल खाडी बरोबरच गड नदी कोपल्याने आज महसूल प्रशासनाने चिंदर, टेरई, बेळणे, श्रावण नदी वाडी, गोठणे या चार गावातील सात कुटुंबातील २६ माणसांचे स्थलांतर केले आहे. या चारही गावातील स्थलांतरित ग्रामस्थ गावातील नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले आहेत. चिंदर तेरई वाडी येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्ती, बेळणे येथील एका कुटुंबातील पाच व्यक्ती, श्रावण येथील एक कुटुंब आणि गोठणे गावातील तीन कुटुंबातील पंधरा व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page