वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

सभेत अभिनंदनाच्या ठरावा व्यतिरिक्त कोणतेही ठराव नाहीत

*💫वेंगुर्ला दि.२३- :* वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या बॅ. नाथ पै सभागृहात ऑनलाईन पद्धतीने झाली. या सभेत अभिनंदनाच्या ठरावा व्यतिरिक्त कोणतेही ठराव किंवा महत्वाच्या सूचना झाल्या नाहीत. काही सदस्यांना ऑनलाईन काहीच ऐकू येत नसल्याने त्यांना सूचना मांडता आल्या नाहीत. त्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुढील होणाऱ्या पंचायत समितीच्या मासिक सभा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या सभेस उपसभापती सिद्धेश परब, पंचायत समिती सदस्या प्रणाली बंगे, साक्षी कुबल, गौरवी मडवळ, यशवंत परब, मंगेश कामत, गटविकास अधिकारी उमा पाटील घारगे व विविध खात्याचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना केंद्रीत मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंगेश कामत यांनी मांडला. ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत कुशेवाडा ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव गौरवी मडवळ यांनी मांडला. वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर सामंत या कोरोना काळात उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. वेंगुर्ले आगारातून सकाळी ६.३० वाजता सुटणारी व सातार्डाहून ७ वाजता परत येणारी एस. टी. बस सुरू करण्यात यावी, अशी सूचना यावेळी उपसभापती सिद्धेश परब यांनी मांडली. गटविकास अधिकारी उमा पाटील यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page