तांत्रिक बिघाडामुळे थांबल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सोडला सुटकेचा निश्वास
*💫देवगड दि.२२-:* देवगड समुद्रात वीस वर्षापूर्वी आढळलेल्या अलमुर्तदा जहाजाची आठवण करून देणारी घटना गुरूवारी सकाळी देवगडवासीयांनी अनुभवली. देवगड पवनकी समोरील समुद्रात उभ्या असलेल्या महाकाय जहाजाने सर्वांचीच झोप उडविली. मात्र हे प्रवाशी जहाज गुजरातकडे जात असल्याचे व तांत्रिक बिघाडामुळे थांबल्याचे निष्पन्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेबरोबरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. देवगड पवनचक्कीसमोर समुद्रा गुरूवारी सकाळी एक महाकाय जहाज नागरिकांना दिसले. वादळी वातावरण व सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस अशा स्थितीत पवनचक्की समोर संशयास्पद महाकाय जहाज दिसल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली. या जहाजाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. देवगड पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलीस कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करून जहाजाबाबत माहिती घेतली यावेळी हे जहाज प्रवाशी जहाज असून ते इंडोनेशिया या देशातून गुजरात येथे दुरूस्तीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले. वर्ल्ड नावाचे हे जहाज असून इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे जहाज देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात थांबले आहे. जहाजामध्ये प्रवाशी नसून फक्त कर्मचारी आहेत. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्यांचा यंत्रणेशी संपर्क साधला असून यंत्रणा जहाज दुरूस्त करून अथवा पर्यायी व्यवस्था करून जहाज घेवून जाणार आहे. या जहाजामध्ये संशयास्पद काहीही नसल्याचे मेंगडे यांनी सांगितले. यापुर्वीही देवगड समुद्रात अलमुर्तदा जहाज बंद अवस्थेत आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती. त्यानंतर जुन २०१० मध्ये देवगड तांबळडेग समुद्रकिनाऱ्यासमोर खोल समुद्रात संशयास्पद जहाज आढळल्याने खळबळ उडाली होती.
