देवगड-प्रतिनिधी : संपुर्ण आयुष्य ज्यांनी काव्य, गझल लेखनात लेखन पत्रकारीत घडविलेल्या सुप्रसिध्द गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांना देवगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. देवगड तालुक पत्रकार संघाच्यावतीने देवगड येथील उमाबाई बर्वे लायब्ररीच्या स्नेहसंवर्धक सभागृहामध्ये कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, प्रशांत वाडेकर, संतोष कुलकर्णी, दयानंद मांगले, राजेंद्र मुंबरकर, सुरज कोयंडे, राजू पडवळ, वैभव केळकर, रुत्वीक धुरी, दर्शन दुखंडे आदी उपस्थित होते. कै. मधुसूदन नानिवडेकर आदरांजली वाहतेवेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद म्हणाले की, कै. मधुसूदन नानिवडेकर यांनी अनेक कविता व गझल व आपल्या लेखनातून प्रबोधनात्मक काम केले आहे. त्यांचे अकाली निधन होणे म्हणजे लेखन क्षेत्राला फार मोठा धक्का आहे. त्यांनी अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष पद देखील भुषविले होते. सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर हे साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ओळखले जात होते. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या गझला अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केल्या आहेत.अशा महान कवी गझलकार व लेखकाला आपण मुकलो असल्याच्या भावना देवगड तालुका पत्रकारांनी व्यक्त करुन आदरांजली वाहिली. यावेळी संतोष कुलकर्णी, दयानंद मांगले, प्रशांत वाडेकर, राजु मुंबरकर यांनी कै.नानिवडेकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुत्विक धुरी यांनी केले.
गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांना देवगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने आदरांजली
