मालवण दि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्क आयोगाची स्थापना केली असून संयुक्त राष्ट्र संघात भारत देश हा सदस्य असल्याने भारतात आयोगाने जे ३० मानवाधिकार निर्माण केले आहेत. ते भारतीयांवर बंधनकारक आहेत मात्र दुर्दैवाने या मानवाधिकारांबद्दल सामान्य माणसांमध्ये माहितीचा अभाव दिसून येतो. यासाठी मानवाधिकारांबद्दल जनजागृती होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवणचे सुप्रसिद्ध वकील ऍड. सुदर्शन गिरसागर यांनी भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज मालवण येथे बोलताना केले. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मालवण तालुका विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज मालवणमध्ये जागतिक हक्क दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मानवाधिकाराबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ऍड. गिरसागर हे बोलत होते. यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. खोत, ऍड. सुमित जाधव मालवण न्यायालयाचे कर्मचारी श्री परब यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य व्ही. जी. खोत यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना ऍड. सुदर्शन गिरसागर म्हणाले, मानवी हक्काधिकार संकल्पने अंतर्गत वृद्ध, अपंग व्यक्तीं, खाजगी क्षेत्रातील कामगार संघटनेत काम करणाऱ्या घटकांना संरक्षण देणाऱ्या तरतुदी या मानवाधिकारामध्ये करण्यात आल्या आहेत. मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास कुणीही व्यक्ती ही दाद मागू शकते त्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर विधी सेवा समित्या स्थापन करण्यात आल्या असून मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास या समितीकडे दाद मागावी. यादृष्टीने सर्वसामान्य माणसांपर्यंत मानवी हक्कांची माहिती पोहचणे व त्याबाबत शिक्षण मिळणे आवश्यक आहे असेही ऍड. गिरसागर म्हणाले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ऍड. सुमित जाधव यांनी केले.
मानवाधिकारांबदल जनजागृती होणे महत्त्वाचे- अँड. सुदर्शन गिरसागर
