सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले गावात रस्त्यावर आले पाणी

💫वैभववाडी दि.२२-: कोल्हापूर जिल्हा वाढलेल्या पावसामुळे गगनबावडा तालुक्यातही गुरुवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. पाऊस व जोराच्या वाऱ्याने तालुक्यास अक्षरशः झोडपून काढले. गेले चार दिवस तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने कुंभी नदीला पूर आला आहे. कुंभी नदीच्या पुराचे पाणी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर मांडुकली व खोकुर्ले या ठिकाणी आले. त्यामुळे सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कोकण व घाटमाथा यांना जोडणारा हा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर करूळ घाट आहे. परंतु तो घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले गावात मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे.

गगनबावडा तालुक्‍यात पावसाने आज थैमान घातले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभी, सरस्वती, धामणी व रुपणी नद्यांना पूर आला आहे. तालुक्‍यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. कुंभी नदीवरील अणदुर, मांडुकली, वेतवडे, पळसंबे व रेव्याचीवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी सायंकाळी सात वाजता कुंभी धरणाच्या सांडव्यावरून १२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.

गगनबावडा तालुक्‍यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात १३७.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुंभी धरण क्षेत्रात आज १८६ मिलिमीटर तर कोदे धरण क्षेत्रात १४३ मिलिमीटर पाऊस झाला. कुंभी धरणातून विद्युत निर्मितीसाठी ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे प्रकल्प यापूर्वीच भरला असून धरणाच्या सांडव्यावरून ९७७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सरस्वती नदीपात्रात होत आहे.

You cannot copy content of this page