राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कारवाईची केली मागणी
*💫कणकवली दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 66 या नॅशनल हायवेच्या चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झाले आहे.काही ठिकाणी हायवे काँक्रीटला भेगा पडल्या आहेत. रस्त्याची साईडपट्टी खचली असून भराव वाहून गेला आहे. कणकवली शहरातील एस एम हायस्कुल समोरील बॉक्सेलचा ब्रिज दोन वेळा कोसळला असून याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून याबाबत हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाची वारंवार तक्रार शासन दरबारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासन आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे काय ? असा सवालही जनतेत उमटत आहे. त्यामुळे हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाबाबत कारवाई व्हावी अशी मागणी पीळणकर यांनी केली आहे. यावेळी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली युवक शहराध्यक्ष संदेश मयेकर, अजय जाधव, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.
