कणकवलीतील नागरिकांनी केली पोलीस निरीक्षकांकडे मागणी
*💫कणकवली दि.१६-:* कणकवलीत उड्डाणपुलाचा रस्ता खचल्याप्रकरणी धोकादायक मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करावी व वेगवेगळ्या न्याय संस्थांकडून झालेल्या आदेशाप्रमाणे सदर धोकादायक बांधकाम काढून टाकावे. तसेच न्यायसंस्था यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांच्या निदर्शनास आणून संबंधित ठेकेदार कंपनी, महामार्ग प्राधिकरण व त्रयस्थ संस्थेवर भा. द. वी 188 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी कणकवली पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गतवर्षी हायवेच्या कोसळलेल्या भागाचे काम पुन्हा करण्याबाबत व अतिधोकादायक बांधकाम हटवण्याबाबत आदेश झालेले आहेत. 2020 मध्ये पावसाळ्यानंतर याबाबत कार्यवाही होईल असे सांगत पावसाचे कारण देत टाळाटाळ करण्यात आली. हे धोकादायक काम हटविण्याबाबत महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार कंपनी व त्रयस्थ इन्स्पेक्शन करणारी एजन्सी यांनी आश्वासन देखील दिले होते. पावसाळ्यानंतर या संदर्भात लक्ष वेधण्यात आले. व याकरिता पर्यायी मार्गाची चाचपणी देखील करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या वर्षी देखील मुसळधार पावसामुळे गतवर्षी सारखी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. व त्याचे निरीक्षणही पोलीस निरीक्षक म्हणून केले आहे. मास्क न वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल होतो. मग जनतेच्या जीविताशी खेळणाऱ्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही. असा सवाल यावेळी संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान सदर निवेदनात संदर्भात संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात येईल व गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी दिले. यावेळी कणकवलीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, दया मेस्त्री, संतोष सावंत, बाळू मेस्त्री, डॉ. संदीप नाटेकर, व्यंकटेश सावंत, महेश कोदे, राजेंद्र पेडणेकर, उन्मेष राणे, सादिक कुडाळकर आदी उपस्थित होते.
