असनिये जंगलातील प्रकार;बिबटया की पटेरी वाघ ? याबाबत आहेत मतांतरे
*💫सावंतवाडी दि.१५-:* असनिये येथील जंगल परिसरात चरत असलेल्या एका गाभण म्हैशीवर बुधवारी वाघाने हल्ला करीत तिचा फडशा पाडला. ग्रामस्थांनी बिबट्या नसून तो पट्टेरी वाघच असल्याचे सांगितले. मात्र तो पट्टेरी वाघ आहे की बिबट्या याबाबत सांशकता व्यक्त होत आहे. असनिये गावठणवाडी येथील विश्वनाथ गोपाळ सावंत यांची गुरे बुधवारी जंगल परिसरात सोलीयाचे भरड या ठिकाणी चरण्यासाठी गेली होती. बुधवारी सायंकाळी इतर गुरांसोबत ही म्हैस गोठ्यात न आल्यामुळे सावंत यांनी शोधाशोध केली असता घटनास्थळी म्हैस फडशा पाडलेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडून आली. यामुळे सावंत यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक श्री गोजरे, वनमजूर आत्माराम सावंत आदींनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. दरम्यान या म्हशीचा फडशा पाडलेला बिबट्या नसून तो पट्टेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र तो पट्टेरी वाघ आहे की बिबट्या याबाबत अद्याप काही समजू शकले नाही.
