दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका, फेऱ्या सुरू
*💫बांदा दि.०९-:* कोरोना प्रादुर्भामुळे प्रशासकांची नियुक्ती करून पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने होऊ घातले आहेत. दांडेली व आरोस गावात शिवसेना व भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यात ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षीय चिन्ह नसले तरी, ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांत विजयाची मुहुर्तमेढ रोवण्यासाठी तयारी केली आहे. आरोस व दांडेलीत ग्रामपंचायतचे पूर्ण पॅनलच तयार केले असून अन्य चाचपणी सुरू असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर दांडेलीत यंदा आम्हाला चुरशीचा सामना करावा लागणार असून आमची सर्व तयारी असून सरपंचपदाचा उमेदवारही तयार असल्याचे शिवसेना समर्थक तथा दांडेली माजी सरपंच संजू पांगम यांनी सांगितले. मळेवाड जि.प.मतदारसंघातील आरोस व दांडेली ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना यांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका व फेऱ्या आरोस व दांडेलीत सुरू झाल्या आहेत. अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे विरोधकांचे लक्ष लागले आहे. आपल्या जवळचा कोण? कोणत्या वॉर्डात कोणता उमेदवार सोयीचा पडेल? कोणत्या वॉर्डात कोणत्या समाजाचे मतदान आहे याचा अंदाज घेत चर्चेचे फड रंगू लागले आहेत. एकंदरीत भाजप व शिवसेनेने दोन्ही गावांना मोठी पदे दिल्यामुळे ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता खेचून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून कसोसीचे प्रयत्न केले जाणार आहेत.