पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत शिरण्याची दाट शक्यता
*💫कणकवली दि.१२-:* गेले काही दिवस थांबलेल्या पावसाने दोन दिवसापासून दमदार एन्ट्री मारली असून सिंधुदुर्गात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील सुखनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे सुखनदीपात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. याचबरोबर खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले उभे पीक पाण्याखाली गेले आहे. मुंबई – गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता खारेपाटण हायस्कुल रोड ते खारेपाटण बसस्थानक हा रस्ता देखील पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होण्याच्या स्थितीत आहे. गेली काही दिवस पावसाने कोकणात दडी मारल्यानंतर रविवार पासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे. खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्ण पाण्याखाली बुडाला असून पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळेधारक पुराच्या भीतीने आपल्या वस्तूची आवराआवर करत आहेत. जर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता असून खारेपाटण मधील व्यापारी भीतीच्या छायेखाली आहेत.
