बांधकामचे अधिकारी मासिक सभेला दांडी मारत असल्याने अरविंद रावराणे आक्रमक

उत्तरे देता येत नसल्यास कनिष्ठ अभियंतानी सभेला येवू नये;मासिक सभेत दिली तंबी

*💫वैभववाडी दि.०८-:* सार्वजनिक बांधकामचे अधिकारी मासिक सभेत वारंवार दांडी मारत आहेत. त्यांची ही कार्यपद्धत अशोभनीय आहे. तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. या परिस्थितीला अधिकारी जबाबदार आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना पुढे करून ते मासिक सभा टाळत आहेत. प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील तर पुढील बैठकीत कनिष्ठ अभियंत्यांनी येऊ नये. अशी तंबी उपसभापती अरविंद रावराणे यांनी मासिक सभेत दिली. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन ठराव अरविंद रावराणे यांनी मांडला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, जि.प. बांधकाम अधिकारी श्री सुतार व खातेप्रमुख उपस्थित होते. लोरे नं. 2 ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपक पाचकुडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. तराळे – गगनबावडा या मार्गावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदर खड्डे एजन्सीमार्फत लवकरच डागडुजी केली जाईल तसेच रस्त्याकडील झाडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ती तोडली जातील असे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग शाखा अभियंता डी.जे. कुमावत यांनी सांगितले. फोंडा – उंबर्डे व खारेपाटण – गगणबावडा हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दुरुस्तीबाबत वारंवार सुचना केली जात आहे. परंतु चांगली भाषा अधिकाऱ्यांना समजेनाशी झाली आहे. त्यांना आमदारांचीच भाषा समजत असेल तर त्याचेही नियोजन करु. असे श्री रावराणे यांनी सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी एजन्सीना काम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत असे उत्तर दिले. काम घेणाऱ्या सर्व ठेकेदारांना पुढील मासिक सभेत बसण्याची व्यवस्था करा अशा सूचना अरविंद रावराणे यांनी दिल्या.

You cannot copy content of this page