*💫कणकवली दि.०६-:* झटपट पैसे कमविण्याच्या नादात स्वतः ची बरबादी करून घेण्याचा नवा फंडा निर्माण झाला असून कणकवलीत तर एका युवकाने ऑनलाइन कसिनोतून झटपट पैसे मिळवण्याच्या नादात स्वतःचा खिसा रिकामी केला आणि ऑनलाइन कसिनो एजंटच्या वसुलीच्या तगाद्याने कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे.त्यामुळे ऑनलाइन कसिनो सारख्या जुगाराची पाळेमुळे उखडून काढून याला पायबंद घालण्याचे आव्हान कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर आहे. त्या तरुणावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून शहरात मोबाईलच्या माध्यमातून सुरू असलेला ऑनलाइन कसिनोचा जुगार आणि त्यातून बरबाद होणारी युवा पिढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान विष प्यायलेल्या युवकाच्या गळ्यात असलेली सोनसाखळी शहरातीलच एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाच्या वडिलांकडे सुपूर्त केल्याची माहिती समोर आली आहे. युवा पिढी मोबाईल ऑनलाइन कसिनोतून शॉर्टकट इझी मनी मिळवण्यामागे लागलेली दिसून येते. जुगार हा जुगार असतो कारण एक जेव्हा मालामाल होतो तेव्हा इतर कंगाल झालेले असतात. आणि हरणाऱ्याच्या मागे येथूनच साडेसाती मागे लागते .हरलेले पैसे वसूल करण्यासाठी ऑनलाइन कसिनो एजंट तगादा लावतात आणि पैसे देऊ शकत नसल्यामुळे वसुलीच्या तगाद्याला कंटाळून जुगार खेळणारे तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात असा प्रकार सुरू आहे. कणकवली शहरात यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत मात्र सायबर गुन्ह्यांमध्ये याचा समावेश होत असल्याने शोध लावणे तितकेसे सोपे नसल्याची बाब पुढे आली आहे .कारण या प्रकारात म्हणावा तसा पुरावा ठेवला जात नसल्याने कारवाई करणे सोपे राहिलेले नाही.आजची युवा पिढी झटपट पैसे कमविण्याच्या मागे लागली असल्याने असे प्रकार घडत असले तरी या प्रकाराने पालक वर्गासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निदान आता तरी यंत्रणा सक्षम होणार हा प्रश्न आहे.
ऑनलाइनचा फंडा युवकाच्या जीवावर बेतला!
