मनसे सावंतवाडी तालुकाउपाध्यक्ष सुधीर राऊळ यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी लोकांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधांचे दरपत्रक लावण्यात यावेत, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाउपाध्यक्ष, सुधीर राऊळ यांनी तहसीलदार यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सुधीर राऊळ यांनी म्हटले की, तालुक्यातील अनेक गावांमध्ये शहरांमध्ये सीएससी सेंटर व महा ई सेवा केंद्रे आहेत. परंतु या सर्व केंद्रांवर पी एम किसान, उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र अशा अनेक सुविधा दिल्या जातात. परंतु जसे सावंतवाडी सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी दर फलक लावलेला आहे त्याचप्रमाणे सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणीही दर लावावेत. आज पी एम किसान पेन्शनसाठी अनेक ठिकाणी जनतेकडून १५० ते २०० रुपये आकारले जात आहेत. यात मोठ्या प्रमाणात जनतेची लुबाडणूक होत आहे. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी त्यांना दर पत्रक व ग्राहकाला पावती देण्याच्या सूचना द्याव्यात. आज कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर कोसळलेले आहे. त्यामुळे काहीजणांना रोजगार नाही. गोरगरीब काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यास आज उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी जर १५० रुपये मोजावे लागत असतील तर ही बाब पूर्णतः चुकीची आहे. तसेच काही सेंटरमध्ये परप्रांतीयांना या ठिकाणचे आधार कार्ड तसेच काही दाखले बनवून दिले जात आहेत. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयाजवळ मनसेच्यावतीने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही सुधीर राऊळ यांनी दिला आहे. येत्या दहा दिवसात संबंधित सर्व सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र यांना सूचना देऊन तात्काळ दरपत्रक लावण्यास सांगावे. जर कोण लावत नसतील त्यांची लायसन्स रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी पाठवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी तहसीलदारांजवळ केली.
