वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय देखील बंद
*💫मालवण दि.०७-:* शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर च्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय कारणार आहेत, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेले अकरा दिवस शांततामय आंदोलन सुरूच आहे. केंद्रसरकारने लागू केलेल्या कृषी विषयक नविन सुधारणा कायद्यांतील तरतूदीं बद्दल सर्वसामान्य शेतकऱ्यांचे बरेच आक्षेप आहेत. केंद्रसरकार आणि आंदोलक या मधील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्याने या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या भारत बंदचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचा न्याय हक्क आणि त्यांच्या मागण्या याबाबत जिल्हा व्यापारी महासंघाला पुर्ण सहानुभुतीही आहे. म्हणूनच उद्या ८ रोजी जिल्ह्यातील व्यापारी बांधवानी काळ्या फिती लावून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन व्यापारी महासंघा तर्फे करण्यात येत असल्याचे तायशेटे यांनी सांगितले. वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांचा बंदला पाठींबा शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालवणातील वॉटरस्पोर्स्टस व्यावसायिकांनी देखील पाठिंबा दिला असून यासाठी ८ रोजी वॉटरस्पोर्ट्स बंद ठेवण्यात येणार आहेत. लॉकडाऊन नंतर अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुरू झालेला वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंदर विभागाने पुन्हा बंद करण्याचे आदेश दिल्याने गेले दोन- तीन दिवस वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद आहे. असे असतानाही वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांबाबत सहानुभूती दर्शवित एक दिवस व्यवसाय बंद ठेवून शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.