अन्यथा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना लस घेऊ देणार नाही;पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांचा इशारा
*💫मालवण दि.३०-:* सध्या गावागावात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या दरम्यान ग्रामीण भागात मोबाईल रेंजची चांगली सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थ ऑनलाईन नोंदणी पासून वंचित राहत आहेत. यामुळे अन्य तालुक्यातील नागरिक लसीकरणासाठी त्या गावांमध्ये येत आहेत. परिणामी स्थानिक ग्रामस्थांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ऑफलाईन पद्धतीनेच लसीकरण करण्यात यावे अन्यथा बाहेरून येणार्या व्यक्तींना लस घेऊ देणार नाही, असा इशारा पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी आज मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत दिला. मालवण पंचायत समितीची मासिक सभा आज ऑनलाईन पद्धतीने झाली. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, सुनील घाडीगावकर, मधुरा चोपडेकर, सोनाली कोदे, छाया परब, निधी मुणगेकर, मनीषा वराडकर यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते. मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरणाची मोहिम राबविली जात आहे. मात्र ग्रामीण भागात मोबाईल रेंज नसल्याने अनेक ग्रामस्थांना रजिस्ट्रेशन करताना समस्या भेडसावत आहे. यात ज्या केंद्रावर लसीकरण होते त्याठिकाणी अन्य तालुक्यातील व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागात लसीकरण करताना ते ऑफलाईन पद्धतीने आणि स्थानिकांनाच लसीकरण करण्यात यावे. यात अन्य तालुक्यातून लस घेण्यास आलेल्या व्यक्तींना आम्ही लस घेऊ देणार नाही असा इशारा श्री. घाडीगावकर यांनी दिला. याबाबतचा ठरावही सभेत घेण्यात आला. ग्रामीण भागात कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसबाबत ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीन लसीकडे अनेक ग्रामस्थ पाठ फिरवित आहेत. प्रत्यक्षात दोन्ही लस चांगल्या असून ग्रामस्थांनी या लसचा फायदा घ्यावा असे आवाहन सभापती पाताडे यांनी यावेळी केले. वडाचापाट ग्रामपंचायतीची नवीन इमारत अन्य ठिकाणी बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्यक्षात गेली ४० वर्षे ज्याठिकाणी ग्रामपंचायतीची इमारत होती त्या जमीनमालकाकडून बक्षीसपत्र घेऊन त्याचठिकाणी नवीन इमारत बांधणे गरजेचे होते. मात्र राजकीय द्वेषापोटी ही इमारत अन्य ठिकाणी हलविली जात आहे. ज्याठिकाणी ग्रामपंचायतीची इमारत होती त्याठिकाणी अन्य कार्यालयेही आहेत. ग्रामपंचायतीने संबंधित जमीनमालकाकडे बक्षीसपत्र मागणे आवश्यक असताना ती कार्यवाही न करता अन्यत्र इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याला आमचा विरोध असून हे काम तत्काळ बंद करण्यात यावे. बांधकाम विभागाने याचे बिल अदा करू नये असे श्री. घाडीगावकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी जाधव यांनी ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे त्यांनी ग्रामसभेत अन्य ठिकाणी इमारत बांधण्याचा ठराव केला आहे. यात ज्याठिकाणी पूर्वी इमारत होती त्या संबंधित जमीनमालकाकडे बक्षीसपत्राबाबत ग्रामपंचायतीने मागणी केली का याची माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले. यावर श्री. घाडीगावकर यांनी जमीनमालकाने जर बक्षीसपत्र दिले नाही तर अन्य ठिकाणी इमारत बांधण्यास आमची हरकत नाही. मात्र जर ग्रामपंचायतीने जमीनमालकाशी संपर्कच साधला नसेल तर ते योग्य नाही. शिवाय अस्तित्वात असलेल्या इमारतीवर लगतच्या जागेत जो शासनाचा खर्च गेल्या ४० वर्षात करण्यात आला त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित करत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. दरम्यान वडाचापाट ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या विषयावरून सुनील घाडीगावकर व कमलाकर गावडे यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. राजकीय द्वेषानेच ही इमारत अन्यत्र हलविली जात असल्याचा आरोप श्री. घाडीगावकर यांनी केला तर ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे. त्यांनी जो निर्णय घेतला असेल त्यानुसार कार्यवाही होईल असे गावडे यांनी सांगितले. यावरून वाद विकोपाला जात असताना सभापती, गटविकास अधिकार्यांनी मध्यस्थी करत या प्रकरणाची माहिती घेतली जाईल असे स्पष्ट केले. रेवंडी खाडीपात्रात वाळू व्यावसायिकांकडून खाडीपात्रात भराव टाकण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्यात गावास धोका निर्माण झाला आहे. अनधिकृतरीत्या टाकलेला हा भराव हटविण्यात यावा असा आदेश खनिकर्म विभागाने देऊनही अद्यापपर्यत त्यावर कार्यवाही झालेली नाही. यात संबंधित विभाग आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप सोनाली कोदे यांनी केला. याठिकाणी कांदळवनाची तोड झाली असून त्याची तक्रार करूनही संबंधित विभागाकडून यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याबाबत सौ. कोदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी तहसीलदारांची भेट घेत चर्चा करून त्या
