जेष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ रामचंद्र धनावडे यांचे निधन

पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात होते त्यांचे योगदान

*💫मालवण दि.२८-:* साळेल नांगरभाटवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक संघ मालवणचे अध्यक्ष रामचंद्र शंकर धनावडे (वय ७५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने मालवण येथे उपचारादरम्यान निधन झाले. श्री धनावडे हे पत्रकार आणि वृत्तपत्र एजंट म्हणूनही कार्यरत होते साळेल नांगरभाटवाडी येथील रहिवाशी असणारे रामचंद्र धनावडे हे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. मुंबई येथे मोठया हुद्द्यावर काम केल्यानंतर गावाच्या ओढीने साळेल येथे आलेल्या धनावडे यांनी गावाच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात झोकून देऊन काम केले . साळेल तंटामुक्ती समितीचे त्यांनी सलग १० वर्षे सचिव पद भूषवित गावाला तंटामुक्ती ग्राम पुरस्कार मिळवून देण्यात मोठा वाटा होता. ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय सुविधा मिळण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळवून दिला. धनावडे यांनी समाजकार्याची धुरा वाहताना काही काळ पत्रकारिता क्षेत्रातही काम केले. गेले काही दिवस ते आजारी असल्याने त्यांच्यावर मालवण येथे उपचार सुरू असताना निधन झाले. सोमवारी दुपारी साळेल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रिक्षा व्यावसायिक सुबोध धनावडे यांचे ते वडील होत. धनावडे यांच्या निधनाने वृत्त समजताच साळेल गावावर शोककळा पसरली.

You cannot copy content of this page