विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही शाहू महाराजांची दूरदृष्टी

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानात डॉ.सतिश कदम यांचे प्रतिपादन

*💫कणकवली दि.२७-:* आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि आरोग्य तपासणी ही धोरणे महत्वाची ठरली.कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात प्लेगची साथ आली असता आरोग्यसेवेत पुढाकार घेतला आणि आधुनिक काळाप्रमाणे विलगीकरण, तसेच गावोगावी आरोग्य तपासणी पथकांची स्थापना केली कल्याणकारी सामाजिक धोरणे राबविणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एकमेव दूरदृष्टीचे राजे ठरले असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष तथा तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ.सतीश कदम यांनी व्यक्त केले. कणकवली महाविद्यालय सांस्कृतिक विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आँनलाईन फेसबुक व्याख्यानात डॉ. सतीश कदम यांनी मार्गदर्शन केले. ‘राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक धोरणे’ या विषयावर पुढे बोलताना डॉ.सतिश कदम म्हणाले की, साथीच्या रोगराई नंतर दुष्काळी संकट ओढावते,लोकांच्या हातची कामे थांबतात त्यामूळे रोजगाराअभावी उपासमार ओढावते याची जाण ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी सारख्या धरणांची कामे सुरू केली त्यातून रोजगार निर्मिती आणि जलसंधारण हे दोन्ही उद्देश साध्य झाले.तसेच साथीच्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी विरळ लोकसंख्येची गावे वसवली. त्यातून पुढे शेतात वस्ती करण्याची पद्धत राजर्षी शाहू महाराज यांच्या कालखंडापासून सुरू झाली ती आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते.या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी अध्यक्षीय भाषणात ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आढावा घेतला. शाहू महाराजांनी कला,क्रीडा, तंत्रज्ञान, शिक्षण, न्याय व्यवस्था, साहित्य, संस्कृती,कॢषी, उद्योग, पाणलोट क्षेत्र, अशा सर्व क्षेत्रात प्रागतिक सुधारणा केल्या.राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा रुजविणे ही काळाची गरज असून पुर्णपणे अस्पृश्यता, जातीयता निवारण, वंचितांना आरक्षण अशा धोरणांची जेव्हा काटेकोर अंमलबजावणी होईल तेव्हाच शाहू जयंतीचा खरा संदेश समाजात पोचेल’. असे स्पष्ट केले. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले, पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.युवराज महालिंगे,प्रा.प्रमोद कोरगावकर,प्रा.हरीभाऊ भिसे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ.बाळकॢष्ण गावडे, डॉ.बाळू राठोड,प्रा.तेजस जयकर,प्रा.सुरेश पाटील,प्रा.अरविंद उमरीकर,प्रा.गणेश टेकळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.युवराज महालिंगे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन प्रा.हरीभाऊ भिसे यांनी केले.

You cannot copy content of this page