कोरोना काळात जिल्ह्यावासीयांना आरोग्य सेवा पुरविण्यास सत्ताधारी आमदार व पालकमंत्री अपयशी !

कुडाळ येथील राड्याला आमदार वैभव नाईकच कारणीभूत;भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप

*💫कुडाळ दि.२३-:* कोरोना काळात जिल्ह्यात योग्य आणि पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री कमी पडले असल्यानेच जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून, मृत्यू संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळ येथे झालेला राडा हा वैभव नाईक यांनी केला असून, एक पेट्रोल पंप जाहीर केला असताना त्यांनी मुद्दाम दुसऱ्याच पेट्रोल पंपावर कार्यक्रम केला. वैभव नाईक हे केवळ भाजपच्या पाठिंब्यामुळे आमदार झाले आहेत. हे ते विसरले आहेत. परंतु, भाजप त्यांना त्याची आठवण करून देत त्यांचे गर्वहरण करेल अशी जोरदार टीका वैभव नाईक यांचे नाव न घेता आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस हे आमचे शत्रु नसून, केवळ विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे भाजप नेते किंवा त्या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्यास त्याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. नेत्यांच्या भेटी गाठी होतच असतात. असे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सिंधुदुर्गातील तिन्ही मतदार संघात येत्या दोन दिवसांत कोव्हिड सेंटर उभे करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, अतुल काळसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page