Headlines

दहा वर्षे पूर्ण झालेल्या ग्रामसडक रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीचा प्रस्ताव…

बांधकाम समिती सभेत ठराव; नादुरुस्त रस्ते, शाळांची स्थिती आणि पुलाच्या भरावावरून सदस्यांची नाराजी..

सिंधुदुर्गनगरी ता २४
दहा वर्षे पूर्ण झालेल्या आणि नादुरुस्त असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडकचे रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा. असा ठराव आजच्या बांधकाम समिती सभेत घेण्यात आला.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संतोष साटविलकर, समिती सचिव तथा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, सदस्य रुपेश कानडे, केशव नारकर, संजय बोबडी, दीपलक्ष्मी पडते, सूदन कवठणकर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अनेक रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे. ज्या रस्त्यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. असे आदेश सभापती संतोष साटविलकर यांनी सभेत दिले.

बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दिलेली फाईल किती टेबलवर फिरते, त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो अशी माहिती सदस्यांनी मागील सभेत मागितली होती. यावर चर्चा होऊन केवळ बांधकाम विभागाकडील कामाच्या माहिती द्यावीच, त्याशिवाय सर्वच विभागांच्या फाईल किती टेबलावर फिरतात आणि मंजूरीसाठी किती दिवस लागतात याची माहिती पुढील सभेत द्यावी अशी सूचना सभापती संतोष साटविलकर यांनी सभेत केली.
जिल्ह्यात किती शाळा नादुरुस्त आहेत त्याची माहिती मागील सभेत सदस्यांनी मागितली होती. मात्र ही माहिती न मिळाल्याने आणि दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील सभेत योग्य पद्धतीने माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या .

नव्याने उद्घाटन झालेल्या पुलावरील भराव खचला

कुडाळ तालुक्यातील कुंदे ते आंब्रड रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरील भराव पाहिल्याच पावसात खचला आहे. याबाबत आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या दीपलक्ष्मी पडते यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी सूचना केली. तर संबंधित ठेकेदाराला वेळीच खचलेला भराव सुस्थितीत करून देण्याच्या सूचना करावी असे आदेश सभापतींनी दिले.

You cannot copy content of this page