६७२ घरेलू कामगारांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा

जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांची माहिती;राज्य शासनाकडून दिलासा

*💫मालवण दि २१-:* महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०२१ पासून लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत म्हणून रुपये १५०० जाहीर केले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६७२ नोंदीत घरेलु कामगारांना त्यांचे खात्यावर कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या कडून तशी आर्थिक मदत जमा करण्यात आल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री भगवान साटम यांनी दिली आहे. एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात ब्रेक द चेन या शीर्षकाखाली लॉकडाऊन जाहीर करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असंघटित कामगारांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये बांधकाम कामगार, रिक्षा व्यावसायिक व घरेलु कामगार यांचा समावेश आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी बांधकाम कामगारांना रुपये १५०० आर्थिक मदत मंडळ कार्यालय मुंबई येथून कामगारांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली. त्याचप्रमाणे सन २०१५ ते २०२१ पर्यंत ज्या घरेलु कामगारांनी आपली घरेलु कामगार म्हणून नोंदणी केली होती अशा घरेलु कामगारांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांचे जवळ १२ लाख ७२ हजार एवढी रक्कम महाराष्ट्र शासनाकडून वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार आता पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवित, नोंदीत व ६० वर्षाच्या आतील ६७२ घरेलु कामगारांना रुपये १५०० एवढी मदत त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरित घरेलु कामगारांचे बँक डिटेल्स त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आले आहेत. त्याही कामगारांना आर्थिक मदत मिळणार असल्याची माहिती श्री. साटम यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात सन २०१२ पासून लाखो कामगारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे सन २०१२ ते २०१४ अखेर ज्या घरेलु कामगारांनी मंडळाजवळ नोंदणी केलेली आहे. त्या ही कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी. याप्रकरणी भारतीय मजदूर संघ पाठपुरावा करत असल्याचे साटम यांनी सांगितले.

You cannot copy content of this page