धोंडी चिंदरकर यांचे राणेंवरील प्रेम म्हणजे नौटंकी

यापूर्वी त्यांनी राणेंची साथ सोडली होती;सेना तालूकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात भाजपचे नेतृत्व सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पूर्वी राणेंची साथ सोडलेली आणि आता ते राणे कुटुंबावर दाखवत असलेले प्रेम म्हणजे नौटंकी असून अळवावरचे प्रेम आहे. चिंदरकर यांनी आपल्या डोळ्यावरील गॉगल काढल्यास त्यांना शिवसेनेने केलेली विकास कामे दिसतील, अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. मालवण शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिंदे, न.प. बांधकाम सभापती मंदार केणी, जोगी, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, नारायण राणेंनी सत्तेत असताना मेडिकल कॉलेज न काढता स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले. मात्र ठाकरे सरकारने सत्तेत येताच तात्काळ शासकीय मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. राणेंनी त्याचवेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत केली असती तर आज बिकट वेळ आली नसती. आमदार वैभव नाईक यांना आव्हान देणाऱ्या धोंडी चिंदरकर यांनी प्रथम आपल्या डोळ्यावरचा गॉगल काढावा. तरच त्यांना शिवसेनेने केलेली कामे दिसतील. सरकारने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी निधी दिला आहे. पेंडूर येथे २० बेडचे कोविड सेंटर होत आहे. चौके, हिवाळे, पेंडूर, मसुरे येथे रुग्णवाहिका आमदारांनी दिल्या आहेत. स्वतः काही सहकार्य करायचे नाही, केवळ लॉकडाऊनमध्ये सर्व खुल करण्यासाठी आंदोलने करायची आणि नंतर आमदार, खासदार, पालकमंत्र्यांवर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका भाजपची आहे. या भूमिकेचा आपण निषेध करतो. आमदार वैभव नाईक फार्मसी कॉलेज उभारत असून आमदारांना आव्हान देणाऱ्या चिंदरकर यांनी आम्हाला विद्यार्थ्यांची लिस्ट द्यावी आम्ही त्यांना मोफत शिक्षण देतो, अन्यथा आम्ही कोरोना रुग्णांची लिस्ट देतो त्यांच्यावर राणेंच्या हॉस्पिटलवर मोफत उपचार करावेत, असे आव्हान हरी खोबरेकर यांनी चिंदरकर यांना दिले आहे.

You cannot copy content of this page