*पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा : नरेश देऊलकर यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.०६-:* आरोंदा दशक्रोशी परिसरात गुरांना विचित्र त्वचा रोगाने ग्रासले आहे. शेकडो गुरांना या त्वचा रोगाची लागण झाली आहे. आैषधोपचार करूनही परिणाम होत नसल्याने शेतकरी त्रस्त बनला आहे. या रोगावर योग्य निदान करून आैषधोपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मनसेचे आरोंदा विभाग प्रमुख नरेश देऊलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीपत्रकात देऊलकर म्हणाले की, आरोंदा दशक्रोशी परिसरात गुरांना विचित्र असा त्वचा रोग होत आहे. ताप येऊन गुरांच्या त्वचेवर गाठी सदृश्य फोडी येतात. त्यात पू तयार होताे त्या ठिकाणी जखम तयार होऊन यामध्ये गुरे दगावण्याचाही धोका निर्माण झाला आहे. या रोगावर लवकरात लवकर योग्य उपाय न झाल्यास हा रोग फैलावण्याची शक्यता आहे. याची शासनाच्या पशुसंवर्धन तज्ञांमार्फत दखल घेऊन या रोगावर संशोधन करावे व गुरांवर योग्य उपचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देऊलकर यांनी पत्रकातून केली आहे. गुरांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास शासनाकडून विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र यासाठीं वर्षाकाठी एका गुरासाठी ४०० रुपये भरावे लागतात. प्रत्येक गुरासाठी एवढी रक्कम भरणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवणारे नाही. यासाठी विमा शुल्क १०० रुपये विमा संरक्षणाची ४ ते ५ वर्षांची मदत ठेवून करून शासनाने शेतकऱ्यांचे हित जपावे, अशी मागणीही देऊलकर यांनी केली आहे.