*💫सावंतवाडी दि.२०-:*विकासभाई सावंत यांचा आज ५८ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाबद्दल ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा घेतलेला हा धावता आढावा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कॅबिनेटमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र असलेल्या विकास सावंत यांना राजकीय वारसा हा त्यांचे वडील भाईसाहेब सावंत यांच्याकडूनच लाभला. २० जून १९६३ रोजी विकास सावंत यांचा जन्म झाला. आज त्यांनी वयाची ५८ वर्ष पूर्ण केली असतानाही एका तरूणाप्रमाणे ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील माजगावसारख्या ग्रामीण भागातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथील आर. बी. हायस्कूलमधून घेतले, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त केल्यावर सुकृती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. स्वत: चा व्यवसाय सांभाळत असतानाच सामाजिक कार्याची उपजत आवड असल्याने त्यांनी स्वतः ला सामाजिक कार्यात वाहून घेतले. समाजकारण करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला, मात्र, त्यांनी केवळ राजकारण न करता सहकाराची कास धरुन त्यातच आपला एक वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक पद भूषविले असून राज्य सहकारी बँकेच्या असोसिएशनचे संचालक म्हणून ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक व जिल्हा बँकांची शिखर संस्था म्हणून कार्यरत असलेल्या या बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सहकाराला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. कै. भाईसाहेब सावंत नागरी पतसंस्था सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे गेली २५ वर्षे सातत्याने ते प्रतिनिधीत्व करीत आहेत. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक म्हणून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान लाभले. सहकार क्षेत्राबरोबरच विविध शैक्षणिक क्षेत्रातही विकास सावंत कार्यरत आहेत. त्यांच्या या महान कार्याला ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलचा सादर प्रणाम…
सहकार व शिक्षण क्षेत्रातील चळवळ वृद्धिंगत करणारा नेता -विकासभाई सावंत
