*💫मालवण दि०५-:* लॉकडाऊन मुळे बंद असलेला वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय दिवाळी कालावधीत जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात आल्यानंतर बंदर विभागाने हा व्यवसाय वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा बंद करण्याचे आदेश दिल्याने आक्रमक बनलेल्या वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी आज मालवण बंदर कार्यालयात धडक देत घेराव घातला. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मान्य नसेल तर आम्हाला तसे लेखी द्या, आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्याने आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार, आमच्यावर कारवाई केल्यास होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहतील असा इशारा यावेळी संतप्त वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी दिला.
कोरोना महामारी काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मालवणच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय आठ महिने बंद राहिल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनलॉक प्रक्रियेत पर्यटन सुरू झाले तरी वॉटरस्पोर्ट्स व्यवसायास परवानगी न मिळाल्याने व्यावसायिकांकडून परवानगी मिळण्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी प्रथम सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीस व त्यानंतर दिवाळी कालावधीत वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय अटीशर्तीसह कोरोना विषयक खबरदारी घेण्याची सूचना देत सुरू करण्यास परवानगी दिली होती. यास महिना होत असतानाच काल बंदर विभागाने अचानक वॉटरस्पोर्ट्स बंद करण्याचे आदेश व्यावसायिकांना देत नोटिसा बजावल्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार हे वॉटरस्पोर्ट्स बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावल्या असून शासनाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत वॉटरस्पोर्ट्स बंदच राहतील अशी भूमिका मालवणच्या बंदर अधिकाऱ्यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आज संतप्त बनलेल्या मालवण, देवबाग येथील वॉटरस्पोर्ट्स आणि सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक व्यावसायिकांनी मालवण बंदर विभाग कार्यालयावर धडक देत घेराव घातला. ज्यावेळी जिल्हाधिकारी यांनी होडी वाहतूक व वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी दिली त्यावेळी बंदर विभागानेही हे व्यवसाय सुरू करण्यास सहमती दर्शवली असताना आता अचानक या व्यवसायास परवानगी का नाकारत आहे. असा सवाल यावेळी किल्ला होडी व्यावसायिकांनी उपस्थित केला. तर लॉकडाऊनमुळे आठ महिने व्यवसाय ठप्प राहिल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले असताना आता पुन्हा वॉटरस्पोर्ट्सवर बंदी आणून बंदर विभाग आमच्या पोटावर पाय आणत आहे असा आरोप यावेळी वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी उपस्थित केला. जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटरस्पोर्ट्सला दिलेली परवानगी बंदर विभागास मान्य नसेल तर तसे आम्हास लेखी द्यावे. बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मालवणात यावे त्यांच्या समोर आम्ही प्रश्न मांडू असे यावेळी वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटरस्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार. बंदर विभागाने आमच्यावर कारवाई केल्यास त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहतील असा आक्रमक इशाराही यावेळी वॉट्सपोर्टस व्यावसायिकांनी बंदर अधिकाऱ्यांना दिला.